मुंबई : नॅशनल क्रश आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हीडीओ फेक होता. मॉर्फ व्हीडीओ आणि ओरिजनल व्हीडीओ ट्वीट करत एका युजरने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, रश्मिकाने या व्हायरल व्हीडीओवर प्रतिक्रिया दिली. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांनीही चिंता व्यक्त केली होती. आता, याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा रश्मिकाचा मोठा फॅन आहे.
रश्मिकाच्या डीपफेक व्हीडीओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली. यापूर्वी तपासादरम्यान बिहारमधील १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली होती. त्यानंतर, आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी रश्मिकाचा जबरा फॅन असून बीटेक इंजिनिअर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ईमानी नवीन असे आरोपीचे नाव असून त्याने डीपफेक व्हीडीओ बनवल्याची कबुलीही दिली. ईमानी हा रश्मिकाच चाहता असून त्याने तिच्या नावाने इंस्टाग्राम पेज सुरू केले होते. त्यासोबतच इतरही दोन अभिनेत्यांच्या नावाने पेज तो चालवतो, त्यांना लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
तर, रश्मिकाच्या नावावरील पेजला ९० हजार फॉलोअर्स होते, ते फॉलोअर्स वाढविण्यासाठी त्याने हा डीपफेक व्हीडीओ बनवल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपीने चेन्नईतील एका इंजिनिअरींग कॉलेजमधून बीटेक शिक्षण घेतले आहे. तसेच, २०१९ मध्ये गुगलचा डिजिटल मार्केटींगचा कोर्सही पूर्ण केला आहे. तर, वेबसाईट डेव्हलंिपग, फोटोशॉप, युटयूब व्हीडीओ आणि एडिटिंगसारखे कोर्सही पूर्ण केले आहेत. त्याने, युटयूबवरुनच डीपफेक व्हीडीओ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
काय म्हणाली होती रश्मिका?
रश्मिकाने व्हायरल झालेल्या डीप फेक व्हीडीओबाबत एक ट्वीट केले होते. मला हे शेअर करताना अत्यंत दु:ख होत आहे. पण, ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हीडीओबाबत भाष्य करणे गरजेचे आहे. असा व्हीडीओ केवळ माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे आपलं खूप नुकसान होत आहे. आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मला पाठिंबा दिलेले कुटुंबीय, चाहते आणि मित्रपरिवाराची मी आभारी आहे. पण, जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना हे माझ्याबरोबर घडले असते. तर याकडे मी कसे पाहिले असते याचा मी विचारही करू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडण्याआधी एक समाज म्हणून याकडे आपण लक्ष दिले पाहिजे असे रश्मिकाने ट्वीटमध्ये म्हटले होते.