पुणे: ‘कॅबिनेटमध्ये सध्या गँंगवॉर सुरू आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाही. भुजबळ यांनीदेखील त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखविली आहे. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेटमध्ये बोलू दिले जात नसल्याने त्यांना बाहेर येऊन बोलावे लागते, हे दुर्दैव आहे, याचे मला वाईट वाटते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना टोला लगावला.
सातारा रस्ता परिसरात एका कार्यक्रमासाठी खासदार सुळे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘राज्यात लोकशाही आहे. दिल्लीत दडपशाही आहे. आमचे निलंबन त्याचाच भाग आहे. निवडणूक आयोगाचे हक्क काढले आहेत, प्रेस कायद्यावर बंधने आणली आहेत.’
संजय राऊत यांनी लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे, त्यावर पक्षाची काय भूमिका आहे, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘‘शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली आहे. येत्या १५ दिवसांतच लोकसभेच्या जागा वाटपाची माहिती तुम्हाला दिली जाईल, तुम्ही काळजी करू नका.’
जालन्यातील घटनेला फडणवीस जबाबदार
देवेंद्र फडणवीस यापूर्वी राज्याचे गृहमंत्री होते. त्या वेळीदेखील नागपूर क्राइम कॅपिटल होते. आताही फडणवीस गृहमंत्री असून नागपुरातील गुन्हे वाढले आहेत. अमली पदार्थ पुरवठा करणा-यांसंदर्भात मोठी माहिती पुढे येईल, असे फडणवीस म्हणाले होते, त्याचे नेमके काय झाले. जालन्यातील लाठीहल्ल्यालाह्या गृहमंत्रीच जबाबदार आहेत, अशा शब्दांत सुळे यांनी निशाणा साधला.