मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये आपल्या शत्रूवर हल्ला केला. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. २०१७ मध्येही गायकवाड चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की त्यांना गँगस्टर सुरेश पुजारी याने ५० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी त्यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाला माहिती दिली होती. त्यानंतर कल्याण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
गणपत गायकवाड यांनी दावा केला होता की, त्यांना गँगस्टर सुरेश पुजारीने चार दिवसात दोनवेळा फोन करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांना पहिला फोन १५ नोव्हेंबर आणि दुसरा फोन १७ नोव्हेंबरला आला होता. सुरेश पुजारीने धमकी दिलीये की ५० लाख रुपये दिले नाहीत, तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
दोन आठवड्यात तिघांना धमकी
पोलिसांनी सांगितले होते की, दोन आठवड्याच्या काळात तिघांना अशाप्रकारचे फोन आले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, व्यावसायिक भास्कर शेट्टी यांचा समावेश होता. यांना सुरेश पुजारीने २५ लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
खंडणी प्रकरणी गणपत गायकवाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. सुरेश पुजारीकडून पोलिसांना देखील हफ्ता जातो. पोलिसांनी मात्र गायकवाड यांचा हा दावा फेटाळून लावला होता. गायकवाड यांनी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन फोन आल्याचा दावा केला होता.