मोहोळ : लसणाची फोडणी महागली असून किरकोळ बाजारात सध्या चारशे रुपये प्रति किलोपर्यंत दर आहे. यापुढे हा भाव आणखी वाढून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शेवग्याच्या शेंगेनेही ६०० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला असून स्वयंपाक घर, हॉटेल, ढाब्यावरील भाज्यांमधून लसणाचा वास दिला जात असून मेन्यू मधील शेवग्याची शेंग गायब झाली आहे. लसणाला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, यंदा लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढत आहेत. जुन्या लसणाची आवक जवळपास संपली असून नवीन लसूण लागवड चालू आहे. त्यामुळे बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने लसणाचे दर प्रचंड वाढले आहेत. यावर्षी देशासह राज्यातील लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी महागडा लसूण आणि शेवगा शेंग विकत घ्यायचे टाळत आहेत.
यापूर्वी जानेवारी महिन्यातही लसणाच्या दराचा मोठा भडका उडाला होता. वाढलेले भाव मध्यंतरी थोडे कमी झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा भाव वाढले आहेत. बाजारात सध्या लसूण ३५० ते ४०० रुपये प्रति किलो किरकोळ बाजारात विकला जात आहे; तर घाऊक बाजारात लसणाचा दर कमाल ४०० रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यतः महाराष्ट्रात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होते. भाव वाढत असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.जानेवारी ते मे या कालावधीत नवीन लसणाचे उत्पादन होते. त्यानंतर आवक फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. त्यामुळे यावर्षी नागरिकांना महागडाच लसूण खावा लागणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.