नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ते जगातील १२ व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली आहे.
त्याच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ७.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी १२ व्या स्थानावरून १३ व्या स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या २४ तासांत त्याची एकूण संपत्ती ६६५ दशलक्षने वाढली आहे. अदानी समूहाचा मालक आणि आता भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत १२व्या क्रमांकावर आले आहेत.
गुरुवारपर्यंत अदानी या यादीत १४ व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांनी केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता १४ व्या स्थानावरून १२ व्या स्थानावर पोहोचले आहेत. ते भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.