मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज मंगळवारी (दि. १०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अदानी यांनी यावेळी अभिनंदन केले. दरम्यान, त्यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अदानी यांनी आज ‘सागर’ बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाल्याचे समजते.
अदानी महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीने भाजप आणि अदानी संबंधांचा मुद्दा उचलून धरला होता. विशेषत: मुंबईतील धारावी येथील जमीन अदानी यांना देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. तसेच राज्यात सत्तेत आल्यास धारावीतील अदानी समूहाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करून त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे दिली जातील, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.
संसदेच्या दोन्ही सभागृहांतही अदानी मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे आज मंगळवारीही दोन्ही सभागृहांत कामकाज होऊ शकले नाही. आज मंगळवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, ‘मोदी-अदानी भाई-भाई’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या.