22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रताप, सर्दी, खोकला असल्यास कोरोना चाचणी करा

ताप, सर्दी, खोकला असल्यास कोरोना चाचणी करा

राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना

मुंबई : पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांच्यामार्फत पुढील काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला इत्यादी लक्षणे असणा-या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी अशा सूचना राज्य कोरोना कृती दलाकडून देण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. रुग्णालयात भरती होण्याच्या प्रमाणही कमी असून, मृत्यूच्या संख्येतही वाढ झालेली नाही. मात्र नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त सुटी घेऊन पर्यटनासाठी गेलेले नागरीक घरी परतले आहेत. त्यांच्यामार्फत कोरोना परसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणा-या व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. तसेच बाधित आढळल्यास त्यांच्या सतत संपर्कात येणा-या व्यक्तींचीही करोना चाचणी करण्यात यावी, अशी सूचना राज्य कोरोना कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सर्व रुग्णालयांसह नागरिकांना दिल्या आहेत.

कोरोना बाधित व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारसाठी न्यावे, रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस शक्यतो गृहविलगीकरणात ठेवावे. तसेच शक्यतो खिडक्या बंद न करता घरात हवा खेळती राहील याची नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

लक्षणे असणा-यांनी मुखपट्टी वापरा
कोरोना लक्षणे असणा-या रुग्णांनी इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मुखपट्टी वापरावी. करोना बाधित व्यक्तींनी इतरांमध्ये मिसळणे टाळावे. अतिजोखमीच्या व्यक्तींनी करोना लक्षणे असणा-या व्यक्तींचा संपर्क शक्यतो टाळावा अथवा संपर्कादरम्यान मुखपट्टीचा वापर करण्याचा सल्लाही राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला.

प्राधान्याने चाचणी करा
रॅपिड अंटिजेन चाचणीनुसार बाधित आढळल्यास लक्षणानुसार उपचार करण्यात यावे. लक्षणे असून रॅपिड अँटिजेन चाचणी नकारात्मक असल्यास अशा रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR