मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मुंबईतील एकाही रस्त्याचे काम अजून सुरू झालेले नाही तरीही अर्धवट कामांचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने या कामांची चौकशी करावी, अशी शिवसेना ( ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज केली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रस्त्यांचे, कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. त्या वरून आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईत भूमिपूजन करायला येण्यापूर्वी रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला केले आहे.
चौकशी न करता, अर्धवट कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यामुळे पंतप्रधानांची आणि पंतप्रधान कार्यालयाची बदनामी होते, असे सांगतानाच ज्या कामांमध्ये परवानगी मिळालेल्या नाहीत त्या कामांचे घाईघाईत भूमिपूजन करणे कितपत योग्य आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन त्यांनी करू नये, अशी आपण त्यांना विनंती केली होती. कारण हा मिंधे गटाचा महाघोटाळा असून गेल्या २ वर्षांत फक्त ९ टक्के काम मुंबईत काँक्रिटीकरणाचे काम झाले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामातील धक्कादायक बाब समोर आणली. या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने दिलेली बँक गॅरंटी ही परदेशातील आहे. ही बँक वेस्ट इंडिजमध्ये आहे. त्या बँकेला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे काय? ती बँक मान्यताप्राप्त बँक आहे काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी बजावले. आमची मुंबई आणि महाराष्ट्राला लुटू नका. तुमचे काम नियमितपणा करा, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल मात्र लुटायला गेलात तर सोडणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी या वेळी दिला.