15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुलींचा यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल!

मुलींचा यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल!

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोफत शिक्षण योजना लागू केली आहे. ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागू केल्याने त्याचा परिणाम यंदा मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थिनींनी विविध पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. हे प्रमाण प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४१.५५ टक्के इतके आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन यांच्या अखत्यारितील शिक्षण संस्थांमध्ये राबवल्या जाणा-या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणा-या विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी, मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता.

या सरकारच्या निर्णयाला राज्यातील पालकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्यभरातून ३ लाख ३४ हजार ९०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये १ लाख ३९ हजार १६३ मुलींचा समावेश आहे. यात अभियांत्रिकी बी.ई./ बी.टेक या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती दिली आहे. यंदा या अभ्यासक्रमाला ५२ हजार ६६९ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. गतवर्षी याच अभ्यासक्रमाला ३८ हजार ६२६ मुलींनी प्रवेश घेतला होता.

त्याखालोखाल बी. एड. अभ्यासक्रमाला २० हजार ४७६ मुलींनी यंदा प्रवेश घेतला असून, गतवर्षी २२ हजार ३२७ मुलींनी प्रवेश घेतला होता. एमबीए अभ्यासक्रमाला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १९ हजार ३३४ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला तर गतवर्षी १४ हजार ५३२ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. सर्वात कमी प्रतिसाद बी.एड., एम.एड. (एकात्मिक) या अभ्यासक्रमाला मिळाला असून अवघ्या १५ मुलींनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रमाला ५९ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींनी उत्साह दाखविला आहे. त्यामुळे आगामी काळात मुलांसोबत मुलीदेखील सर्वच क्षेत्रात चमकताना दिसतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रमाण वाढले
राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना शुल्क माफ केल्याने यंदा मुलींचा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. यंदा हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ४१.५५ टक्के इतके आहे. गतवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा-या विद्यार्थिनींचे प्रमाण ३९.९१ टक्के इतके होते.

थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणा-यांची संख्या वाढली
थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेणा-या विद्यार्थिनींची संख्याही अधिक आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला १३ हजार ५७५ मुलींनी प्रवेश घेतला आहे. तसेच थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला ६ हजार ८१८ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR