मुंबई : प्रतिनिधी
शपथविधीला २ दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे ११ मंत्रिपदाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदे हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेटपद आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपालपदाचीही मागणी असल्याची माहिती आहे. या मागणीसाठी अजित पवार दिल्लीत तळ ठोकून आहेत. परंतु अमित शाह यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेला नाही.
दरम्यान, अमित शाह काही अटींसह पद देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून, राज्यात आणि केंद्रात गाठीभेटी सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधी भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर अजित पवार सक्रीय झाले आणि त्यांनी राज्यात अधिकाधिक मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच शिंदे यांच्या शिवसेनेएवढेच मंत्रिपदे आम्हाला मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला करिष्मा दाखवू शकला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार बॅटिंग करत ५४ पैकी तब्बल ४१ आमदार निवडून आणून आपला स्ट्राइक रेट वाढवला आणि आता याच स्ट्राईक रेटवर पुढील वाटाघाटीत बोलणी सुरू केल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या बळावर दिल्लीत एक कॅबिनेट आणि राज्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच आपल्या देखील पक्षाला तितकीच मंत्रीपदे दिली जावीत, अशी मागणी केली. यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व थेट दिल्लीत मागच्या २४ तासांपासून ठाण मांडून बसले आहे.
शरद पवार यांचा पक्ष फोडल्यास केंद्रात मंत्रिपद?
शरद पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार सोबत आल्यास प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात संधी देण्याबाबत विचार केला जाईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षाच्या वतीने खासदार आणि आमदाराना संपर्क साधण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शरद पवार यांचे एकूण ८ खासदार आहेत.