अयोध्या : गुजरातमधील २००२ च्या गोध्रा हत्याकांडात प्राण गमावलेल्या ५९ लोकांपैकी १९ कारसेवकांचे कुटुंब अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
विहिंपचे पदाधिकारी अशोक रावल यांनी याबाबत माहिती दिली. गुजरातमधील इतर निमंत्रितांमध्ये ३२० संत आणि १०५ मान्यवरांचा समावेश आहे.
विश्व हिंदू परिषदेचे गुजरातचे सरचिटणीस अशोक रावल म्हणाले, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्यांना लावण्यात आलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कारसेवकांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. ते मृत कारसेवक अयोध्येहून अहमदाबादला परतत होते.
ज्यांचे संपर्क तपशील उपलब्ध आहेत अशा ३९ पैकी २० कारसेवकांच्या कुटुंबीयांशी विहिंप संपर्क करू शकले. त्यातील १९ जणांनी २२ जानेवारीला अयोध्येत होणा-या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी विहिंपने २२५ कोटी रुपये जमा करून योगदान दिल्याचा दावा रावल यांनी केला.
फेब्रुवारी २००२ मध्ये ट्रेन जाळण्याच्या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाल्यामुळे गुजरातच्या इतिहासातील सर्वात भीषण जातीय दंगल झाली, ज्यामध्ये १,००० हून अधिक लोक मारले गेले. अशोक रावल म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी विहिंपने २२५ कोटी रुपयांच्या देणग्या गोळा करून या उदात्त कार्यात योगदान दिले आहे.