23.9 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रमोबाइल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो

मोबाइल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो

धनंजय देशमुख यांचा इशारा

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक महिना उलटला आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना शनिवारी मोक्का लावला आहे. मात्र या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमक्यांचे सत्र सुरु झाले आहे. धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात आंदोलन पुकारण्याची भूमिका घेतली आहे. या उद्यापासून आमचे कुटुंब मोबाईलवर चढून आंदोलन करेल असे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

मस्साजोग संरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरणातून हत्या झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यात विविध जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरु आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आठ जणांवर मकोका हा कठोर कायदा लावला आहे. मात्र, या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले आरोपी वाल्मिक कराड मात्र सहिसलामत आहेत. त्याच्यावर मकोका दाखल झालेला नाही. त्यामुळे वाल्मिक कराड यांना मकोका आणि खूनाचे ३०२ कलम लावले नाही तर उद्या सकाळी १० वाजल्यापासून ( सोमवार ) आपल्या कुटुंबाचे आंदोलन सुरु होणार आहे. या आरोपींना सोडले तर ते उद्या माझाही खून करतील. त्यापेक्षा आपण या मोबाईल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारे कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल आपला भाऊ स्वत: संपला. अशा पद्धतीने मारला गेला नाही. याचे त्यालाही समाधान वाटेल अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आहे.
माझ्या न्याय मागण्याला काय अर्थ आहे

आज ३५ दिवस झाले आहेत. आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला आहे. काल रात्रीपर्यंत मला सगळी माहिती मिळणे अपेक्षित होते, सगळे सीडीआर निघालेत का? पुरावे सगळे नष्ट झाल्यानंतर मला सगळे कळणार असेल तर माझ्या न्याय मागण्याला काय अर्थ आहे असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे. खंडणी ते खून प्रकरण यांचे काय कनेक्शन आहे ते सीआयडीने पहिल्या दिवशी ३१ डिसेंबरला सुनावणी झाली तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यावर आरोपीला पंधरा दिवसाचा पीसीआर दिला होता. आरोपीला मकोका अंतर्गत ३०२ च्या खुनाच्या गुन्ह्यात घेतले नाही तर उद्या, दहा वाजता माझे वैयक्तिक कुटुंबियांचे मोबाईलवर चढून आंदोलन असणार आहे असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

ते बाहेर आले तर आमचे खून करतील
हा गुन्हा खंडणीतून झाला आहे. २८ मे पासून माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंत सगळे कालावधी खंडणीतून घडले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपीला जाणीवपूर्वक बाहेर काढले जात आहे. आम्हाला माहिती दिली जात नाही, मी विश्वास ठेवला ते चुकलो का? मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला होता. यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला न्याय मागण्यात काही अर्थ नाही असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. खंडणी आणि खून एकच आहे. त्यांना मकोका आणि खून प्रकरणात घेतलेच पाहिजे माझ्या भावाची हत्या केली, परत ते बाहेर आले तर आमचे खून करतील. मुडदे पाडतील, निष्पाप लोकांना मारतील यांच्याकडे भरपूर माया आहे, ते कशालाच घाबरणार नाहीत म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असे सांगत हे आंदोलन शंभर टक्के होणार असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा
मस्साजोग ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी १३ जानेवारी रोजी टॉवरवरुन चढून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर १४ जानेवारी रोजी आत्मदहन आंदोलन करणार आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगाच्या ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत. मस्साजोग येथील महादेव मंदिरा समोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत करणार आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. वाल्मीक कराड याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करून मकोका लावण्यात यावा, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, शासकीय वकील म्हणून वकील उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, एसआयटी कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिका-याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी. केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR