पुणे : प्रतिनिधी
मनसेचे पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मयुरेश वांजळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मयुरेश वांजळे इच्छुक आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बहुतांश सर्व पक्षांतील नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली आहे. ते नेमकी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप निश्चित झाले नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली. अद्याप कोणत्या पक्षाकडून ते उभे राहणार याबाबत समजू शकलेले नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे खडकवासलामध्ये आता इतर पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे यांची पुण्यामध्ये गोल्डमॅन म्हणून ओळख होती. २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकिटावर उमेदवारी घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केले होते. मनसेचे आमदार असताना त्यांनी मनसे स्टाईलने अनेक आंदोलने देखील केली. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले. त्यांच्या कन्या सायली वांजळे या त्या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आहेत.