नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या सदस्य पक्षांनी शुक्रवारी खासदारांच्या निलंबनावरून आणि संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळल्याच्या मुद्यावरून जंतरमंतरवर आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मीडियावर टीका केली. ते म्हणाले की, मी फोटो काढले हे त्यांनी सांगितले, पण खरा मुदा काय आहे, यावर कोणीच बोलले नाही. खरा मुद्दा बेरोजगारीचा आहे, ज्यावर चर्चा झाली नाही. ते म्हणाले की, संसदेतून १४६ खासदारांची हकालपट्टी करून सरकारने देशातील ६० टक्के लोकांची मुस्कटदाबी केली. भाजप जितका द्वेष पसरवेल, तितके प्रेम आणि बंधुता इंडिया आघाडी पसरेवेल.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून आपल्यामध्ये भीती निर्माण करायची आहे, मात्र काँग्रेस याला घाबरणार नाही. रणदीप सुरजेवाला म्हणाले, आम्ही सर्वजण १४० कोटी जनता, संसदीय प्रतिष्ठा आणि संविधानासाठी लढू. नवी दिल्लीतील संसद भवनाजवळील जंतरमंतरवर आयोजित ‘लोकशाही वाचवा’ या आंदोलनात विरोधकांचे अनेक मोठे चेहरे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी, अधीर रंजन चौधरी, रणदीप सुरजेवाला हे प्रमुख होते.