छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी उद्या (ता. ६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी या निमित्ताने थेट सरकारी यंत्रणेला वेठीस धरत आशासेविकांना महिला घेऊन येण्याचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेला महिलांची गर्दी जमवण्यासाठी या संदर्भातील पत्र पोस्ट करत अंबादास दानवे यांनी महिलांना पंधराशे रुपये देऊन सुद्धा गर्दी होणार नाही, याची खात्री पटल्यामुळे आशासेविकांना टार्गेट देण्यात आल्याचा टोला लगावला आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांनी ट्विट केले असून सनदी आणि अन्य अधिका-यांना गलेलठ्ठ पगार मिळतो तो जनतेच्या सेवेसाठी.
मुख्यमंत्र्यांच्या रविवारी होणा-या ‘स्व कौतुक’ सोहळ्यास आशा अंगणवाडी सेविकांना पिळून घेण्याचे काम आता त्यांच्या कक्षेत आले आहे. सहीपुरती शाई वापरून या अधिका-यांचे काम संपले. मात्र, तुटपुंज्या मानधनात असंख्य कामे करणा-या या आशासेविकांना प्रत्येकी ५० महिला आणण्याचे टार्गेट देणे हा त्यांच्यावर एका अर्थाने जुलूम आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
पंधराशे रुपये दरमहा देऊनही महिला कार्यक्रमाला येणार नाहीत याची बहुधा खात्री झाल्याने आशा सेविकांना पिळून घेतले जात आहे. टार्गेट पूर्ण न झाल्यास कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहेच! मुख्यमंत्र्यांच्या या रविवारच्या ‘मला पहा फुलं वाहा’ सोहळ्यास आता एका पत्रावर शहरातील ३० स्मार्ट बस देण्यात आल्या आहेत.
मग याचे बिल, त्या गाड्यांतील डिझेल हे कोण देणार? असे एका पत्रावर रुपया न घेता सामान्य माणसाला तुम्ही यापुढे अशा बस देणार का आयुक्त जी. श्रीकांत!, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.