बाणेर : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा जाहीर निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मात्र, हत्येचे भांडवल करून महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक सलोखा बिघडवणारे वक्तव्य करणा-यांवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी, असा ठराव वंजारी सेवा संघाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. पुणे येथे वंजारी सेवा संघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष मानसिंग माळवे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. मंजुषा दराडे, किसनराव नागरे, ओबीसी नेते अरुण खरमाटे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
देशमुख हत्या प्रकरणात सर्व वंजारी समाजाला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. आमदार सुरेश धस व अंजली दमानिया यांच्यावर सरकारने लगाम लावावा. काही विघ्नसंतोषी लोक दंगली घडवून आणल्या जातील, अशी वंजारी समाजाविरुद्ध विधाने करत आहेत. अशा समाजविघातक कृत्य करणा-या लोकांचा सरकारने बंदोबस्त करावा. अन्यथा वंजारी समाजाला रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर द्यावे लागेल. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर सरकारने योग्य खबरदारी घ्यावी, असा इशारा वंजारी सेवा संघाकडून देण्यात आला.
समाजाची बदनामी करणे योग्य नाही
बीड जिल्ह्यात एकाच जातीचे लोक नोकरीला असल्याचा मुद्दा उपस्थित करून वंजारी समाजाविषयी संशय निर्माण केला जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीने एका विशिष्ट समाजाची बदनामी करणे योग्य नाही. आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केले होते.