32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्रजीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

जीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

मुंबई : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्याने मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शासनाने जो जीआर काढला आहे. तो जीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत रक्ताचे नाते असल्याशिवाय त्याला दाखला देता येणार नाही, अशा मागासवर्ग आयोगाच्या सूचना नाही तर त्यांनी असे कायद्यात स्पष्टपणे नमूद करून ठेवले आहे. हा विषय राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्गाने मान्य केल्या शिवाय त्याला कायदेशीर स्वरूप येणार नाही.

सरकार प्रत्येक निर्णय आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेत आहे. क्युरेटिव्ह पिटीशननंतर सरकारने निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्रातील मराठा वर्ग नाराज करून सरकारला चालणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेऊन आपल्या गळ्यातलं घोंगड झटकून टाकावे, अशी अवस्था आज सरकारची दिसत आहे, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण दिले जाईल : दादा भुसे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. येणा-या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिले जाईल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR