पुणे : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता रबी हंगामातील हरभरा पिकावर अळीचा हल्ला झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत.
खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीने शेतक-यांच्या हातातून गेले. त्यानंतर हाती आलेल्या पिकांना योग्य बाजारभाव नसल्याने शेतक-यांचा लावलेला खर्चही निघाला नाही. शेतक-यांना रबी हंगामावरच आशा होती. त्यामुळे शेतक-यांनी हरभरा, गहू व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून खरिपातील तूर पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
वातावरणातील बदलाने हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला. कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या भेटीत अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही कीड हरभ-याची रोपे, शेंडे, पाने कुरतडून पीक फस्त करते. ही नियमित येणारी कीड नाही. त्यामुळे नुकसानीची तीव्रता पाहता किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत कृषि शास्त्रज्ञांचे आहे. अचानक हवेतील आर्द्रता वाढल्यास ही कीड मोठ्या प्रमाणात बाहेर येते.
याची प्रजननक्रिया वाढते. मादी कीड पिकाच्या पानावर व कोवळ्या शेंड्यावर समूहाने ४५० पर्यंत अंडी घालते. ही अळी झाडाच्या बुंध्याशी, तणाच्या किंवा काडी-कच-याच्या ढिगा-याखाली मातीत दबून असते. विशेष म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव रात्री अधिक होत असल्याचे विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच कोंडीत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. यंदा शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यात आता किडीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
मुळकूज, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव
हरभरा पिकावर अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. हरभरा पिकावर अळीसोबतच मुळकूज व बुरशी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतक-यांनी शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन कृषि विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.