19.8 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता

आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता

पिंपरी : नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून परळी तालुक्यातील दैठणा घाट या आपल्या मूळ गावावरून निघालेला आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सख्ख्या भाचीचा मुलगा पिंपरी-चिंचवड शहरातून बेपत्ता झाला. पिंपळे निळख येथील रक्षक चौकात गुरुवारी (२ जानेवारी) ही घटना घडली.

सुमित भागवत गुट्टे (वय २४, रा. दैठाणा घाट, ता. परळी, जि. बीड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुमित यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुमित याचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी तो गावावरून पिंपरी-चिंचवड येथे आला. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून तो गावावरून शहरात आला होता.

दोन दिवस तो आळंदी येथे राहिला. त्यांनतर गुरुवारी सकाळी तो रक्षक चौक येथे आला. मात्र, तेथून तो बेपत्ता झाला. त्याचा फोनही त्यांनतर बंद येत आहे. शुक्रवारी तो पुणे स्थानकावर दिसून आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीला गुट्टे यांच्या गावातच दिले आहे. सुमित हा त्यांच्या भाचीचा मुलगा आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेच्या निषेधार्थ परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मात्र, आमदार गुट्टे या मोर्चाला उपस्थित राहू शकले नाहीत. आपला नातू बेपत्ता झाला असल्याने मला या मोर्चात सहभागी होता आले नाही, असे आमदार गुट्टे यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR