नवी दिल्ली : जीएसटी काउन्सीलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे. मात्र, आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटीसंदर्भात काउन्सिलने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय, धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटीच द्यावा लागणार आहे.
या बैठकीत हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर लागणारा जीएसटी कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर हे प्रकरण अधिक अभ्यासासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे पाठविण्यात आले. जीओएमला ऑक्टोबर, २०२४ पर्यंत आपला अहवाल तयार करावा लागेल. यावर आता नोव्हेंबर, २०२४ मध्ये होणा-या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत चर्चा होईल.
हेलीकॉप्टर सर्व्हिसवर ५ टक्के जीएसटी
या बैठकीत धार्मिक यात्रा करणा-यांनाही दिलासा देण्यात आला आहे. धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता १८ ऐवजी ५ टक्के एवढाच जीएसटी भरावा लागणार आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जीएसटी परिषदेने आमची मागणी मान्य केली आहे. मात्र, ही सुविधा शेअरिंग हेलिकॉप्टर सेवा घेणा-यांनाच मिळणार आहे. चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतल्यास १८ टक्के एवढाच जीएसटी भरावा लागेल.