नवी दिल्ली : डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
केंद्र सरकारने या प्लॅटफॉर्मना ग्राहकांना स्पष्टपणे कळवण्याचा सल्ला दिला आहे की, सोशल साईट्सवरील कोणती सामग्री आयटी नियमांनुसार ‘प्रतिबंधित सामग्री’ आहे. ‘कंटेंट नॉट परमिटेड अंडर आयटी रुल्स’ लिहून प्रेक्षकांना अशा कंटेंटची माहिती द्यावी, असे सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एआय आणि डीपफेक द्वारे पसरवल्या जाणार्या चुकीची माहिती रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विविध डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत दीर्घ चर्चा केली होती. मंत्रालयाने डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना ग्राहकांना स्पष्टपणे कळवण्यास सांगितले आहे की, अशी सामग्री अपलोड करणे किंवा शेअर करणे दंडनीय गुन्हा आहे.