छत्रपती संभाजीनगर : राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातच्या एका कंपनीने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत दीड हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना चूना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या भूलथापांना बळी पडलेल्या या गुतवणुकदारांचे तब्बल ३५ कोटी बुडाले आहेत. क्विक स्टार्ट २४ ग्रुप या कंपनीने गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन कार्यालयाला टाळे लावून धूम ठोकली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवरील एका इमारतीत या कंपनीने आपले अलिशान कार्यालय थाटले होते. मुळची गुजरातमधील असलेली क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कोट्यवधींची रक्कम जमा झाल्यानंतर कंपनीचे मालक, अधिकारी व कर्मचारी पसार झाले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता गुंतवणुकदारांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झालेले उपअभियंता सरताजसिंग चहल यांना या कंपनीने २१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर निवृत्त शिक्षक नाथाराव काकडे यांना दहा लाखांना फसवले. कंपनीने फसवणूक केली असे हजारो गुंतवणूकदार आता हतबल झाले असल्याचे या प्रकरणात तक्रार दाखल केलेले सरताजसिंग चहल यांनी सांगितले. मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहा यांनी गुंतवणूकदारांना दाखवले होते. छत्रपती संभाजीनगर शहरात वर्दळीच्या ठिकाणी कंपनीने आपले कार्यालय थाटले होते. सुरुवातीला काही महिने गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परताव्याची रक्कम मिळत गेली. नंतर मात्र रक्कम मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार घाबरले.
कंपनीच्या शहरातील मुख्य शाखेत धाव घेतली, तेव्हा त्याला टाळे लागल्याचे दिसले. या प्रकरणातील आरोपी शीतल व विठ्ठल या दोघांनी आपले मोबाईल बंद केल्यामुळे आम्हाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तक्रारदार नाथाराव काकडे यांनी सांगितले. या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीला नेण्यात येईल असे आमिष दाखवले.
कंपनीच्या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांची संख्या दीड हजारांवर आहे. यांच्याकडून तब्बल ३५ कोटी रुपये कंपनीने गोळा केले होते. विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांची कागदोपत्री नोंद, नोटरी रजिस्ट्री ही गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले.
दरम्यान, गुन्हा दखल झाल्यानंतर क्विक स्टार्ट २४ कंपनीचा मालक मुख्य आरोपी प्रतीक शहाने पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हीडीओ समोर आला आहे. त्यात त्याने पोलिसांना आर्थिक ज्ञान नसते, कोणीही त्यांच्याकडे गेले तर ते गुन्हा दाखल करून नोटीस देतात. चौकशीला बोलावितात, पण शेवटी गुन्हेगार कोर्ट ठरविते. कोणी पैसे खाऊ घातले तर पोलिसांची भाषा बदलते, असे म्हणत पोलिसांवरच आरोप केले आहेत.