कळंब : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील हळदगाव येथील प्रतिक रणजित सावंत या तरुणाने मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. हळदगाव येथील तरूण प्रतिक सावंत हा पोलिस भरतीची तयारी करत होता. अनेकवेळा प्रयत्न करून ही त्याची थोडक्या मार्काने संधी हुकत होती. जर आरक्षण असते तर सहज भरती झालो असतो, असं तो मित्रांना सांगत होता.
मिळालेल्या माहितीनुसार हळदगाव ता. कळंब येथील तरूण प्रतिक सावंत हा पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला यश मिळत नव्हते. त्यामुळे तो सततच्या नैराश्याने हताश झाला होता. शुक्रवारी दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास त्याने शेतातील पत्र्याच्या शेडच्या आडुला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.आत्महत्या करण्यापुर्वी त्याने मी प्रतिक रंजीत सावंत, मराठा आरक्षण मिळावे, म्हणून आत्महत्या करत आहे.आरक्षण मिळालेच पाहिजे. मी माझे आयुष्य याच्यासाठी संपवत आहे. तरी सरकारने याची दखल घ्यावी. एक मराठा लाख मराठा, असा मजकूर लिहून गळफास घेतला. या घटनेने हळदगाव गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.