24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना ठरवून त्रास; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना ठरवून त्रास; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

नागपूर : विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जातोय, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.बारामती अ‍ॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. रोहित पवार यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती.

रोहित पवारांच्या ईडी चौकशी प्रकरणी राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ‘जो कुणी चांगलं काम करतो, सरकारच्या विरोधात कुठली भूमिका घेतो, त्यांच्या विरोधात चौकशी नेमली जाते. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जातोय. मात्र रोहित पवार आमचे युवा नेते आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष रोहित पवारांच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.

अनिल देशमुख यांनी यावेळी सरकार आणि केंद्रीय यंत्रणावर टीकास्त्र डागत म्हटले की, रोहित पवारांनी राज्यात ८०० किलोमीटरची चांगली संघर्ष यात्रा काढली. यामध्ये त्यांनी युवकांचे, शेतक-यांचे प्रश्न सभागृहात मांडले. चांगले काम करणा-यांविरोधात सरकार अशा कारवाया करत आहे. रोहित पवार हे आमचे युवा सहकारी आणि खंबीर नेते आहेत. ते या चौकशीला खंबीरपणे सामोरे जातील. असाच त्रास मला, संजय राऊत, आणि नवाब मलिकांना दिला जातो आहे. फक्त विरोधकांना टार्गेट केलं जातंय. मात्र भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई होत नाही. असे असले तरी आज आम्ही सर्व रोहित पवारांच्या सोबत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले.

निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार
ईडीला मोठी ताकद आहे. एकदा अटक झाली तर वर्षभर बेल होत नाही. जर २०० लोकांना ईडीने अटक केली तर त्यातील एकाला शिक्षा होते. कन्विक्शन रेट कमी आहे. सध्या भाजप पक्षांतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत. बाहेरून आले आणि पहिल्या पंगतीत बसले. यामुळे भाजप आमदार नाराज आहेत. निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार. त्यांच्यात अस्वस्थता जास्त आहे. त्यामुळे भाजपमधून लोक बाहेर पडणार असल्याचा विश्वास देखील अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR