परभणी : आजची मुलगी हीच उद्याची माता असल्याने प्रत्येक मुलींची सुरुवाती पासूनच सर्वतोपरी काळजी घेणे ही कुटुंबियांची जबाबदारी आहे. पालकांसाठी त्यांची कन्या म्हणजे ईश्वराने दिलेली अनमोल अशी भेट आहे. त्यांचे आरोग्य, शिक्षण, खेळ व मनोरंजन, सुरक्षित वातावरण तसेच त्यांच्या हक्कांची जपणूक याबाबत पालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी केले.
वनामकृवि येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणा-या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. बंगाळे बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. बंगाळे म्हणाल्या की, अद्यापही समाजात मुलींच्या होत असलेल्या बालविवाहामुळे तथा मुलींच्या घटत जाणा-या प्रमाणाचे समाजावर होणा-या दुष्परिणामाची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करुन दिली.
यावेळी मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निता गायकवाड यांनी महाराणा प्रताप कृषि तंत्रज्ञान विश्वविद्यालय, उदयपूर येथून नुकतीच आचार्य पदवी यशस्वीरित्या संपादन केल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रिज सेक्शनच्या बालिकांनी अतिशय सुंदर असे समुहनृत्य सादर केले. तसेच पालक व विद्याथीर्नींनी देखील गाणे, कविता, मनोगत व्यक्त करुन या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळा प्रशासनाचे आभार मानले.
या निमित्यांने शाळेतील सर्व बालिकांना सन्मानीत करण्यात आल्याने आज आम्हाला मुलगी असल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. निता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव यांनी समन्वयिका म्हणून कार्य केले. शिक्षण सहयोगी प्रियंका स्वामी तथा शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले.