नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात निवडणूक लागली तरी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होऊ शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना काल कार्यालयीन निरोप दिला. आता ते उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता राज्यातील सत्तासंघर्षाशी निगडीत सुनावणीसाठी नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. अर्थात, सुनावणीच्या तारखा तात्पुरत्या असून त्या बदलू शकतात. नवीन तारखांनुसार शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी १० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव वादावर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून १५ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २२ जानेवारी रोजी यासंबंधी पहिली सुनावणी झाली. त्यावेळी शिंदे गटाच्या सर्वच आमदारांना नोटीस बजावली.
७ मार्च रोजी विधानसभा अध्यक्षांसमोरील मूळ सुनावणीची कागदपत्रे मागविली. २३ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर २९ जुलैलाही सुनावणी झाली. याच दिवशी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. त्यानंतर यापुढे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी एकाच दिवशी मात्र स्वतंत्र होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर हे प्रकरण वेळापत्रकात येत गेले. मात्र सुनावणी लांबत गेली. आता नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत यावर सुनावणी होऊ शकते.