पुणे : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने तारांबळ उडाली. त्यात मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात सायंकाळी ब-याच भागात दमदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात वीज पडून एक जण ठार झाला. तसेच हिमायतनगर तालुक्यात म्हैस दगावली. तसेच लातूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन म्हशी, दोन बैल ठार झाले. तसेच दोघे जखमी झाले. तसेच बीडमध्ये एक चिमुकली जखमी झाली. याशिवाय बैलजोडी दगावली तर एक चिमुकली जखमी झाली.
मराठवाड्यात लातूरसह ब-याच भागात पावसाने आज दमदार हजेरी लावली. मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. परंतु मान्सूनपूर्व पावसाने आज जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पहिल्याच पावसांत सर्वत्र पाणीच पाणी झाले आणि रस्ते तुडुंब भरले. तसेच सखल भागात पाणीच पाणी झाले. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील कुमठा शिवारात ढगफुटी होऊन ओढ्याला पाणी आल्याने काही काळ रस्ताही बंद होता. उदगीर तालुक्यातील गुडसूर येथे वीज कोसळली. यात बिरबल व्यंकटराव देमगुंडे व कृष्णा बिरबल देमगुंडे जखमी झाले. त्यांच्यावर उदगीर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुमठा शिवारात लहू नागोराव भुत्ते यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. यात गोठा जळून खाक झाला. गोठ्यात ठेवलेले खते, बी-बियाणे व शेती अवजारे यांचे नुकसान झाले. लाळी बु. शिवारात त्र्यंबक पुंडलिक लाळे यांच्या शेतातील बैलवर वीज कोसळून त्यात दोन बैल ठार झाले. लातूर शहर परिसरातही तब्बल दीड तासांपेक्षा अधिक वेळ मोठा पाऊस पडला. या पावसामुळे लातूर शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. सखल भागांतील घरांत पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तू भिजून नुकसान झाले.
तसेच बीड जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसादरम्यान माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे वीज पडून बैलजोडी दगावली. ऐन पेरणीच्या हंगामात बैलजोडीची सोबत नसल्याने शेतक-याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. या शिवाय इतर भागातही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वा-यामुळे ब-याच ठिकाणी नुकसान झाले. यासोबतच नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
बीड जिल्ह्यात बैलजोडी ठार
माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील शेतकरी बाबूराव किसनराव झोडगे शेतातील कामे आटोपून बैलगाडीसह घराकडे परतत होते. त्यावेळी पाऊस सुरू झाल्याने झोडगे शेतातच थांबले. त्यावेळी वीज कोसळून खिल्लार बैलजोडी जागीच ठार झाली. तसेच एका सात वर्षाच्या मुलीला चटका बसून किरकोळ इजा झाली. बैलजोडी दगावल्याने जवळपास दीड लाखांचे आर्थिक नुकसान झाले.
मान्सूनची हजेरी!
नैऋत्य मोसमी पावसाचे काही भागांत आगमन झाले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली. नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान, ख-या अर्थाने येत्या १० जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
गडचिरोलीत २ ठार
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात विजांचा कडकडाटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान दोन ठिकाणी वीज पडून दोन जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.