पुणे : मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आज देखील राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसला. आज शनिवार दि. २४ ऑगस्ट सकाळ ते सोमवार दि. २६ ऑगस्टच्या सकाळपर्यंतच्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील ४८ तासात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार विशेषत: नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुुदुर्ग अशा १४ जिल्ह्यात पुढील ४८ तासात तर अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते. रविवार दि. २५ ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणा-या जलविसर्गाच्या शक्यतेतून, संबंधित नद्यांच्या खो-यात कदाचित पूर-परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.