25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरसोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळले

सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळले

सोलापूर: कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अलिकडे कांद्याची वाढती आवक आणि दर घसरणीसह लिलाव रद्द होण्याचे प्रकार घडत असताना सोमवारी उच्चांकी म्हणजे एक लाख ३० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा दाखल झाला. त्यामुळे प्रतिक्विंटल सुमारे दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

सकाळी झालेल्या लिलावातून कांद्याचे दर पार घसरले. उद्या मंगळवारी पुन्हा कांदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या गुरूवारी एकाच दिवशी ८६ हजार ८०१ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर सरासरी पाचशे ते एक हजार रूपयांपर्यंत कोसळले होते. त्यातच दुस-या दिवशी, शुक्रवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कांद्याच्या आवकमध्ये आणखी वाढ होत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लादल्यामुळे त्याविरोधात राज्यात कांदा बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यांमध्ये कांदा व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील कांदा सोलापुरात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. त्याचा भार कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनावर वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी तब्बल १३०० गाड्यांतून सुमारे एक लाख ३० हजारांपेक्षा अधिक क्विंटल कांद्याची उच्चांकी आवक झाल्याने बाजार समितीचे नियोजन कोलमडले. एरव्ही, दररोज सकाळी दहा वाजेपर्यंत कांदा लिलाव संपतात. परंतु सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत कांदा लिलाव सुरूच होते. बाजार समितीच्या आवारात कांदा वाहतुकीच्या गाड्यांच्या दाटीवाटीमुळे तेथील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती.

दरम्यान, कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून उच्चांकी दर प्रतिक्विंटल तीन हजार तर सर्वसाधारण दर १५०० रूपये ते २२०० रूपयांपर्यंत मिळत आहेत. यात सुमारे दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत दर खालावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ठोक बाजारात सरासरी १५ रूपये २२ रूपयांपर्यंत कांद्याला प्रतिकिलो दर मिळत असल्याचे पाहून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी काढले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR