28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस

शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील १० आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात अजित पवार गटाने हायकोर्टात धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी शरद पवार गटातील १० आमदारांना अपात्र न करण्याच्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य विधिमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. ज्यात ११ मार्चपर्यंत प्रतिज्ञपत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत याचिकेवरील पुढील सुनावणी १४ मार्च रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचे आपल्या निकालात जाहीर केले. हे करतानाच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते. मात्र, पक्ष आमचा असेल तर त्यात दुसरा गट कसा तयार करता येईल, त्यांना दुस-या पक्षात विलिन व्हावे अन्यथा त्यांना आमचा व्हीप लागू होईल, अशी भूमिका जेष्ठ कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी यांनी हायकोर्टात मांडली.

त्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र घोषित करण्याची मुख्य मागणी याचिकेद्वारे केली गेली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क आहे. तो त्यांच्याच गटाचा पक्ष आहे, असा निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकाही अध्यक्षांनी मान्य करायला हव्या होत्या. मात्र, दोन्ही गटातील आमदारांना पात्र घोषित करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे पक्षातील फूट हा पक्षांतर्गत मतभेद असल्याचा चुकीचा निष्कर्ष काढला जातो, असा दावाही रोहतगी यांनी हायकोर्टात केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR