नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्राईलने हमासचा प्रमुख कमांडर इस्माइल हानिया याचा इराणमध्ये घुसून खात्मा केला. त्यानंतर इराण, हमास युद्ध पेटले आहे. त्यांच्याकडून कधीही इस्त्राईलवर हल्ला होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी इराण समर्थक अतिरेकी संघटना हिजबुल्लाहने एकाचवेळी एकामागे एक ५० रॉकेट इस्त्राईलवर डागले.
हिजबुल्लाहने शनिवारी संध्याकाळी दक्षिण लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये हल्ला केला. परंतु इस्राईलच्या हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोमने सर्व क्षेपणास्त्र निकामी केले. अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या हल्ल्यात इस्त्राईलचे काहीच नुकसान झाले नाही.
हिजबुल्लाहने २८ जुलै रोजी इस्त्रायली-व्याप्त गोलान हाइट्स भागातील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला केला होता. त्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इस्राईलने हमासप्रमाणे हिजबुल्लाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. या रॉकेट हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर ३० जुलै रोजी इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला केला. त्यामध्ये हिजबुल्लाहचा सर्वोच्च कमांडर फौद शुकर मारला गेला होता. गोलान हाइट्स फुटबॉल मैदानावर झालेल्या रॉकेट हल्ल्यासाठी इस्रायलने शुकरला जबाबदार ठरवले होते. अमेरिका आणि इंग्लंडने इस्त्राईमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना तातडीने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे.