मुंबई : प्रतिनिधी
चीनमध्ये एचएमपीव्ही या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
प्रकाश आबिटकर म्हणाले की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत.
आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देईल. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाकाळात रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात आले होते. यंदाही कोरोनासारखी तयारी केली जात आहे का? असे विचारले असता केंद्र शासनाने कालच निर्देश जारी केले आहेत. राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे. सध्या विलगीकरण्याची आवश्यकता नाही. तर लोकांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. आरोग्य विभागाच्या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
नागपूरमधील दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’ची लागण
दरम्यान, नागपूरमधील सात वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. ३ जानेवारी रोजी दोघांनाही एचएमपीव्हीची लागण झाली होती. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसून आली. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
अशी घ्या काळजी
खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
साबण, पाणी किंवा अल्कोहलवर आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणे टाळावे?
खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणे टाळावे. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणे टाळावे.
आजारी लोकांपासून लांब राहावे. व्हायरल इन्फेक्शन झालेले असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावे.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.