मुंबई : प्रतिनिधी
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
नेमबाजीत ५० मीटर रायफल ३ पोझिशन या उपप्रकारात कांस्य पदक प्राप्त करणा-या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणा-या सचिन खिलारी या खेळाडूंचा व कुसळे यांच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे व खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेत भरघोस वाढ केली. या पार्श्वभूमीवर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कांस्य पदक प्राप्त करणा-या स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना २० लाख रुपये व पॅरालिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणा-या सचिन खिलारी यास ३ कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
हंगेरीमधील बुडापेस्ट येथे दि. १० ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करून ऐतिहासिक कामगिरी केली. या संघात राज्याचे बुद्धिबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होता, या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख १ कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
वडिलांनी स्वीकारला सन्मान
विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात आहे. त्यामुळे तिच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्या वतीने त्यांचे वडील संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी राज्य शासनाने सर्वच खेळाडूंच्या पाठीवर थाप मारत प्रोत्साहन दिले. त्यामुळे या सन्मान सोहळ््याचे कौतुक होत आहे.