26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल ?

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल ?

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रत्येकी १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला सर्वपक्षीयांनी सभागृहात पाठिंबा दिला होता. मात्र विशेष अधिवेशन संपल्यानंतर या आरक्षणावर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका, असा टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही. आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल, हे लक्षात असू द्या. मुंबईच्या मोर्चात ‘सगेसोय-यां’वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? यात शंकाच आहे. वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही, तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्यांना वाहावे लागेल, हे लक्षात असू द्या,असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR