शिमला : ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. महामार्गापासून ते रस्त्यांपर्यंत सर्वत्र वाहने दिसत आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी हिमाचल प्रदेशात पूर्वीपेक्षा जास्त वाहने पोहोचली आहेत. कुल्लू-मनालीसारख्या शहरात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. कुल्लूचे एसपी संजीव चौहान यांनी माध्यमांना सांगितले की, २३ तारखेला १४०१३ वाहने, २४ डिसेंबरला १५२६० आणि २५ डिसेंबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत ६१२२ वाहने कुल्लूमध्ये आली. ही सर्व पर्यटक वाहने असून ही संख्या खूप जास्त आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लाहौल-स्पिती जिल्ह्यात एक वाहन चंद्रा नदी ओलांडताना दिसत आहे. स्थानिक एसपी मयंक चौधरी यांनी सांगितले की, नुकताच एक व्हीडीओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये थार नावाचे वाहन चंद्रा नावाची नदी ओलांडताना दिसत आहे. या वाहनाविरुद्ध एमव्ही अॅक्ट, १९८८ अंतर्गत चालान जारी करण्यात आले आहे जेणेकरून भविष्यात असे कोणी करू नये. जिल्हा पोलिसांनीही संबंधित ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे.