परभणी : परभणी ते पाथरी जाणा-या रोडवरील पारवा शिवारात मंगळवार, दि.१६ जानेवारी रोजी ज्वारीच्या शेतामध्ये एक मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हा मृत सांगाडा परभणी तालुक्यातील पेडगाव येथील अल्ताफ अकबर शेख याचा असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारवा शिवारातील रेल्वे गेट जवळ गोविंद मुरकुटे यांच्या शेतात दि.१६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अंगात पॅन्ट, शर्ट, पायात बुट असलेला सांगाडा आढळला होता.
या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. हा सांगाडा प्रथमदर्शनी पुरुषाचा असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या प्रकरणी मिसींग तक्रार दाखल असलेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी जावून सांगाडा पाहिला असता कपडे व शरीर यष्टीवरून सदरील मृत इसमाची ओळख पटली आहे. मृत्यू पावलेला इसम पेडगाव येथील अल्ताफ अकबर शेख असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.