सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वीटभट्ट्या सुरू आहेत. वीटभट्टीचालक शासनाचा महसूल बुडवत असल्याची तक्रार झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाने केली आहे. या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
यासोबत जिल्ह्यातील बेकायदा वीटभट्ट्यांची चौकशी करण्याचे निवेदनदेखील त्यांनी प्रशासनाला दिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण ३९ वीटभट्ट्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नियमांचे पालन न करता बेकायदेशीर भट्टया चालवल्या जात आहेत. राज्य शासनाला महसूल न देता बेकायदा भट्टया सुरू असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जोपर्यंत अशा वीटभट्ट्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दक्षिण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी राजाभाऊ बेलेनवरू, दशरथ चव्हाण, दशरथ राठोड, शीतल चव्हाण, पुंडलिक राठोड आदी उपस्थित होते.