परभणी : पूर्णा शहरातील डॉ. आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, सिध्दार्थ नगर, रमाई नगर, नांलंदा नगर, संस्कृती नगरसह रेल्वे कॉलनीमधील शेकडो विद्यार्थ्यांसह वयोवृध्द नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून शहरात यावे लागते. आता लोहमार्गावर विद्युतीकरण झाले असून पादचारी पूल आवश्यक आहे. परिणामी शेकडो विद्यार्थ्यांसह नागरीकांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागत असून तातडीने पयार्यी व्यवस्था करावी अन्यथा रेल्वे रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन विकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे.
पूर्णा रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी येणा-या व जाणा-या गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मागील तीन महिन्यांपासून या स्थानकातील विद्युतीकरण पूर्णत्वास गेले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे विद्यार्थी व अबालवृध्द नागरिक छर्त्यांचा वापर करीत असतात. हाय होल्टेज विद्युत प्रवाहामुळे भिजलेल्या छत्र्यामधील विद्यार्थी व नागरिकांना विद्युत लहरींपासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याची कबूलीही रेल्वे सुरक्षा बलातर्फे देण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाच्या पलिकडील अनेक वसाहतींमधून शेकडो विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शहरी भागात जाण्यासाठी रुळ ओलांडून प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाची निर्मिती यापूर्वीच का केली नाही? संभाव्य विद्युतीकरण लक्षात घेऊन पादचारी पूलाची निर्मिती न करणा-यावर कोणतीही घटना घडल्यास कारवाई केली जाईल का? हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी तात्काळ अन्य एखादा पर्याय अंमलात आणणार आहे का? असा सवाल विचारण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे सुरक्षा बलाने हा धोका जीवावर बेतला जाऊ शकतो असे समुपदेशन विद्यार्थी व पालकांना केले असताना रेल्वे प्रशासनाला मात्र अद्याप उमगले नसावे असेच दिसून येत आहे.
प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळू पाहणा-या विरोधात रेल रोको आंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी तथा आमदार व लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत बहुजन विकास आघाडी या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कराळे यांनी रेल प्रशासनाला दिला आहे.