21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमी पळणारा नाही तर लढणारा माणूस

मी पळणारा नाही तर लढणारा माणूस

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, हे निराश होऊन किंवा भावनेच्या भरात बोललो नाही तर माझ्या डोक्यामध्ये नक्की काही रणनिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत बोललो. त्यांनी लवकरच महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू तोवर काम सुरू ठेवा, असे सांगितले आहे. मी एक मिनीटदेखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही. मी पळणारा नाही तर लढणारा माणूस आहे, असे भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपचे पदाधिकारी आणि आमदारांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या यावर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे मंत्री, नेते, आमदार, व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, असा ठराव करण्यात आला.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या राज्यातील पराभवाची कारणे सांगितली. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. या वेळी तो आपण उचलू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करतानाच महाराष्ट्रात अपेक्षित यश आले नाही त्याची कारणे शोधून ती दूर करण्याचा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला. यशाचे बाप अनेक असतात; पण अशा परिस्थितीत अपयशही ताकदीने अंगावर घ्यायचे असते आणि नवीन निर्धार करायचा असतो. म्हणूनच निवडणुकीमध्ये पक्षाचे नेतृत्व मी करीत असताना अपयशाची जबाबदारी माझी असल्याचे सांगितले होते, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांनी आपल्या राजीनामा देण्याच्या भूमिकेबद्दलही स्पष्टीकरण केले. लोकसभा निवडणुकीत आपण कमी पडलो; परंतु मोकळं करा हे मी भावनेच्या भारत किंवा निराशेतून बोललेलो नाही.

देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. माझ्या डोक्यात निश्चित स्टॅटेजी होती. अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय करू, असे सांगितले आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात; पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी पक्षाच्या वाचाळ नात्यांचे कान टोचले.

पहिल्या तीन टप्प्यांत मोठा फटका

यंदाच्या निवडणुकीत आपण तीन पक्षांशी लढत नव्हतो तर अपप्रचार या चौथ्या पक्षांविरुद्धही लढावे लागले. संविधान बदलणार हा नेरेटीव्ह इतक्या खालपर्यंत गेला की, आपण परिणामकारकरित्या त्याबाबतचा गैरसमज दूर करू शकलो नाही. पहिल्या ३ टप्प्यात मतदान झालेल्या २४ पैकी महायुतीला केवळ ४ जागा मिळाल्या. मराठवाड्यामध्ये मराठा समाजात गैरसमज पसरवला गेला. मराठा समाजाला दोन्ही वेळी आपले सरकार असताना आरक्षण दिलं गेलं. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह अनेक निर्णय आपल्याच काळात झाले मात्र ज्यांनी १९८० पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मतं गेली, हा बुद्धिभेद टिकणार नाही. मराठा आरक्षणाला भाजपचा विरोध असल्याचा अपप्रचार काही प्रमाणात यशस्वी झाला; पण मोठ्या प्रमाणात झाला नाही. तसे असते तर भाजपला ४४ टक्के मतं मिळाली नसती. २०१९ च्या मतांशी आपण तुलना केली आपली प्रत्यक्षात मतं वाढली; पण टक्केवारीचा विचार केला तर एका टक्क्याने मतं कमी झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना मराठी मतदारांनी नाकारले

उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये मराठी माणसाने मतदान केले नाही. त्यांना विशिष्ट समाजाने मतदान केले. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली, असे म्हणतात, मग ती कोकणात का दिसली नाही? कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. पालघर, रत्नागिरी, ठाण्यामध्ये त्यांना एकही जागा नाही. त्यांना मुंबईमध्ये कोणामुळे जागा मिळाल्या? हे सर्वांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातदेखील त्यांना जास्त लीड घेता आली नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. राज्यातील ११ जागा ५ टक्क्यांपेक्षा कमी मतांनी आपण पराभूत झाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR