मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मध्यंतरी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले आहे; परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र फडणवीस काहीही म्हणाले तरी दिल्लीतील नेते निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे नाव स्पर्धेत कायम ठेवले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांना म्हणाले की, मी मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिका-यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे; पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. एक तर मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत महायुतीत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्या वेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१९ ला आमच्या १०५ जागा आल्या होत्या. या वेळी त्याही पेक्षा जास्त जागा येतील.
विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला.
यामुळे एकनाथ शिंदे यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.