कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे मी मंत्रीपदावर आहे. त्यापैकी केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. असे असले तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे अशी खदखद वैद्यकीय शिक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ज्येष्ठत्वानुसार तुम्हाला कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळायला हवे होते. वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. याबद्दल नाराज आहात काय? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे श्रद्धा-सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा आहे. याबाबतच्या माझ्या भावना पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी अशा घटना घडतात. अशावेळी संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढणे गरजेचे असते असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. नेत्यांकडे काय भावना व्यक्त केल्या ते मात्र त्यांनी सांगितले नाही.
हे मी पहिल्यांदाच ऐकले
पहाटेच्या शपथविधीला अजितदादांनी जाऊ नये, यासाठी आपण आग्रह धरल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे त्यावर मुश्रीफ म्हणाले, मुंडे हे असे वक्तव्य करीत असताना मी व्यासपीठावरच होतो. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नये म्हणून त्यांनी अजितदादांना अडविले हे मी पहिल्यांदाच ऐकले. यापूर्वी मी त्यांच्या तोंडून तसे कधीही ऐकलेले नाही.
समन्वयानेच लढू
कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका समन्वयाने लढू असेही मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले.