मुंबई : अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, भाजप ४०० पार बोलले आणि घाबरले आहेत. त्यांचे ४० देखील खासदार निवडून येणार नाहीत. अर्थसंकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सोनईमधल्या सोन्यासारखे माझे मर्द मावळे, काय वर्णन करू मी राज्यभर फिरतोय, ज्यांच्याकडे पक्ष चिन्ह नाही तरीही तुम्ही प्रेम करतात. मी नतमस्तक होतो. माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाख आणि शिवसेना अशी जवळीक नव्हती. २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले आणि आपल्याकडे आलेत मंत्रिपद दिले. आज तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद दिले असते. पण गदाख यांनी निष्ठा ठेवली तुम्ही तिकडे गेले नाही.
जनता आता पंचनामा करणार
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी त्यांनी शेतक-यांच्या बांधावर जायला पाहिले होते. मी पहिला मुख्य मुख्यमंत्री असेल ज्याने शेतक-यांना कर्जमाफी केली. जनता आता पंचनामा करणार आहे. आता किती जणांना पीक विमाची रक्कम मिळाली आहे. तुम्ही १ रुपया भरला पण सरकारचा हिस्सा मित्राच्या कंपनी खात्यात जातोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अन् गद्दारांना खोके मिळतात
शेतक-यांकडून हमी पत्र लिहून घेत आहेत, हे शेतक-यांना कळत नाही. समोरच्या जनतेत मला जगदंबा दिसत आहे. मोदींना वाटते नेते गेले पण पाळीव जनता त्यांच्या मागे जाईल मात्र असे होणार नाही, संकटाच्या छातीवर जाणारा महाराष्ट्र आहे. मोदींना शोभत नाही, तुम्ही देशाचे की, महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत. मी त्यांना हुकूमशाह बोलतो. इथे शेतक-यांना काही मिळत नाही, आणि गद्दारी करणा-यांना खोके मिळतात.
आरएसएसमध्ये चांगले माणसे
मी मागे इथे आलो होतो पाऊस पडत होता, त्याची काय मदत मिळाली. इथे शेतक-यांना काही मिळत नाही. गद्दारांना खोके, राज्य सभा मिळते. शेतक-यांना काय मिळाले? आरएसएसमध्ये चांगले माणसे आहेत, कुटंब सोडून बाहेर राहिले आणि त्यांच्या डोक्यावर असे भ्रष्ट आणि उपरे आणून बसवले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्याचा जास्त घोटाळा त्याला मोठे पद
शिवसेनेत हिंदू बरोबर मुस्लिम बांधव ही येतात ते म्हणतात तुमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आणि भाजपाचे घर पेटवणारे हिंदुत्व आहे. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या ही मोदी गॅरंटी आहे. फडणवीस यांची एक क्लिप आहे. आम्ही सर्वाना नाही घेत, फिल्टर लावले आहे. ज्याचा जास्त घोटाळा त्याला मोठे पद, यांचे हिंदुत्व भ्रष्ट हिंदुत्व आहे, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.