श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. २५ वर्षांपूर्वी काठमांडू येथून दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे आयसी ८१४ विमान हायजॅक झाले होते. तेव्हा, ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडू नये असे आपण तत्कालीन भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला म्हणालो होतो, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.
श्रीनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर निशाणा साधताना नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला म्हणाले त्या अपहरण प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारने तीन दहशतवाद्यांना सोडले होते. त्याचा परिणाम आपण पाहतच आहात. दहशतवादी कारवाया होत आहेत. तेव्हा, असे करू नका, असे मी भाजप सरकारला सांगत होतो. त्यांनी माझे एकले नाही. वारंवार चुका करूनही ते देश मजबू करतील, असे त्यांना वाटते. याशिवाय, कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरवर संपूर्ण नियंत्रण असूनही दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यास केंद्र सरकारला अपयशी ठरले आहे असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
२४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू येथून दिल्लीला जाणा-या विमानाचे उड्डाणानंतर एका तासाच्या आत अपहरण करण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने मौलाना मसूद अजहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. हे सर्व हाय-प्रोफाइल दहशतवादी होते. त्या घटनेच्या वेळी फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.