मुंबई (प्रतिनिधी) : माझ्या ओबीसी समाजाचे आरक्षण समाप्त होतेय, याची आग आमच्या मनात भडकते आहे त्यामुळे मी समाजासाठी लढणार आहे. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. सरकारमध्ये राहावे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मला त्याची चिंता नाही, असे आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.
जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करून कुणबी नोंद असलेल्यांच्या सग्यासोया-यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ओबीसी नेते एकवटले आहेत. त्यांची बैठक काल व आज मुंबईत झाली. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली आहे. त्यासाठी पुढच्या काळात आंदोलन करण्याबाबत आम्ही निर्णय घेतले आहेत. राज्यभर जाहीर सभा होणार आहेत. ओबीसी यात्रा काढण्याचे ठरले आहे त्यासाठी कमिटी नेमली आहे. आधीच ओबीसीत ३७४ वाटेकरी होते त्यांना आम्ही सामावून घेतलं होतं. आता हजार वाटेकरी आले आहेत.
ओबीसींच्या ५४ टक्क्यांमध्ये आणखी २० ते २५ टक्के लोक घुसवले गेले तर कोणालाच काही मिळणार नाही. ३७४ जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले, असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही बोलतो आहोत. मी एकटा नाहीय तर माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्या, आमच्यात कशाला घुसवता? असा सवाल भुजबळ यांनी केला. सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार? असे विचारता भुजबळ म्हणाले की, हे सरकारने आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, मला त्याची चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मला काढायला सांगा, असे आव्हान भुजबळ यांना आणि दिले.
उद्रेक झाला तर सरकार जबाबदार असेल
मराठ्यांना ओबीसींमध्ये घुसवण्याचा जो काही प्रकार सुरू आहे तो थांबवा नाही तर ओबीसींमधील पावणे चारशे जातींच्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
ओबीसींच्या पावणे चारशे जातींचा आरक्षणाचा घास सत्तेत असलेल्यांनी हिरावून घेतला आहे. ५४ लाख कुणबी नोंदी घेऊन त्यांना ओबीसींमध्ये घुसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो सरकारने ताबडतोब थांबवावा. न्या. शिंदे समितीचे जे काही काम सुरू आहे ते ताबडतोब थांबविण्यात यावे. जर का हे थांबले नाही तर मात्र हा महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असे शेंडगे म्हणाले.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी ओबीसीबाबत भुजबळांची घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे म्हटले आहे. मग राष्ट्रवादीची सामूहिक भूमिका काय आहे? हे अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान शेंडगे यांनी दिले.
भुजबळांनी राजीनामा द्यावा – प्रकाश आंबेडकर
भुजबळांनी सार्वजनिकरित्या भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावे व कॅबिनेटमध्ये त्यांचे ऐकले जात नसेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, असा सल्ला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री भुजबळांना दिला आहे. भुजबळांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल. नाही तर एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुस-या बाजूला रडत राहायचं या दोन्ही गोष्टी एकत्र कशा राहतील? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे सध्या सर्वात टॉलेस्ट नेते आहेत. त्यांच्या सिक्सरमुळे इतर मराठा नेते बोल्ड झाले आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी खेळ सुरू केला होता. भाजपाने ओबीसींना गोंजारत राहायचं आणि शिंदे यांनी जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर बोलत राहायचं. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास भाजपाकडून ओबीसींना दिला जात होता; परंतु भाजपाने आम्हाला फसवलं, अशी भावना आता ओबीसींची झाली आहे. भाजपा मराठा समाजातून कधीच आऊट झालेला आहे. आता ओबीसींचाही विश्वास गमावला असल्याचे आंबेडकर म्हणाले.