परभणी : आज दीड महिना उलटला तरीही सोमनाथच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही, यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या नंतर जिल्हाधिका-यांना भेटायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. तुम्ही मला न्याय दिला नाही मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार असल्याचा इशारा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी दिला आहे. माझा जीव गेला तरी बेहतर पण मी न्याय घेणारच, असा पवित्रा विजयाबाई यांनी घेतला.
परभणीत झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले आणि या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड करून अनेकांना अटक केली होती. आंदोलकांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
परभणी शहरातील शनिवार बाजार येथील मैदानापासून हा मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय ही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातात संविधानाचे फलक घेऊन मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान सरकार जाणून-बुजून या तीनही कुटुंबीयांना न्याय देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र आम्ही न्यायालयीन लढा लढू पण आम्ही या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देऊ, अशी भूमिका वंचितच्या नेत्यांनी घेतली आहे.