मुंबई : लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणा-या राज ठाकरेंनी आता देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील, मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा असेल असे राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केले.
सगळे पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत असताना राज ठाकरेंनी हे मोठे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपच्या इतर सर्व मुद्यांना विरोध करत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मात्र पाठिंबा जाहीर केल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले की निवडणुका संपल्या, शिमगा संपला. देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेले आहे. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे.
पण प्रत्येक गोष्ट आमचे ऐकून करा.
राज ठाकरेचा पाठिंबा भाजपला की महायुतीला?
राज ठाकरेंच्या या वक्तव्याने काही प्रश्न देखील जन्माला घातले आहेत. राज ठाकरेंचा फक्त फडणवीसांना म्हणजेच भाजपला पाठिंबा असेल की महायुतीला? शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वगळून राज ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा असेल? या प्रश्नाची उत्तर कधी मिळणार याची महाराष्ट्राला उत्सुकता असेल. दरम्यान राज ठाकरेंनी विविध विषयांवरून विरोधकांना धारेवर धरले. मनसे हा हरलेला पक्ष नाही असे बोलून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. प्रयागराजमध्ये झालेल्या गंगास्रानावरून देखील त्यांनी नदी सफाईचा मुद्याला पुन्हा हात घातला. गंगा सफाईवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करणा-यांना देखील धू-धू धुतल्याचे दिसून आले.
औरंगजेबाची कबर असायला हवी
ज्या फडणवीसांना राज ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्या फडणवीसांच्या भाजपने औरंगजेबाची कबर हटवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार म्हणून औरंगजेबची कबर असली पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली. जो औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता त्याला मराठ्यांनी याच मातीत गाढले. औरंगजेबाची कबर पाहून हा इतिहास प्रत्येकाला समजेल. शिवरायांचा पराक्रम शिकवण्यासाठी शाळेच्या सहली औरंगजेबच्या कबरीजवळ नेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला.