नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाच्या शेवटच्या रविवारी ११७ व्यांदा मन की बातवर भाषण केले. पंतप्रधानांनी संविधान दिन आणि महाकुंभ यांचा उल्लेख केला. कुंभमध्ये सहभागी होताना समाजातील फूट आणि द्वेषाची भावना दूर करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
यंदाचा हा ९ वा आणि शेवटचा भाग होता. लोकसभा निवडणुकीमुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये एपिसोड प्रसारित झाले नाहीत. २४ नोव्हेंबर रोजी ११६ वा भाग आला. डिजिटल अटक, स्वामी विवेकानंद, एनसीसी, लायब्ररी यांसारख्या मुद्यांवर पंतप्रधान बोलले. वर्षभर चालणा-या अनेक उपक्रमांना २६ नोव्हेंबरच्या संविधान दिनापासून सुरुवात झाली आहे. संविधानाच्या वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी एक वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही संविधानाची प्रस्तावना वाचून तुमचा व्हीडीओ अपलोड करू शकता. वेगवेगळ्या भाषांमध्ये संविधान वाचू शकतो संविधानाबद्दल प्रश्नही विचारू शकता.
पुढील महिन्यात १३ तारखेपासून प्रयागराज येथे महाकुंभ होणार आहे. संगम काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. कुंभ कार्यक्रमात प्रथमच अल चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. याद्वारे कुंभशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांमध्ये मिळू शकते. यासह, कोणीही मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो.
जागतिक व्यापारी एकत्र येणार
जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच व्हेव समिट पुढील वर्षी देशात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही दावोस बद्दल ऐकले असेल जिथे जगातील व्यापारी नेते एकत्र येतात. त्याचप्रमाणे व्हेव समिटसाठी जगभरातून मीडिया आणि मनोरंजन जगतातील लोक भारतात येणार आहेत. भारताला जागतिक सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ही शिखर परिषद एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.