रायगड : मराठा नेते मनोज जरांगे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे नारायण राणे संतापले होते. नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना चॅलेंज देत आपण मराठवाड्यात येऊन सभा घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या चॅलेंजवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना खोचक वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या खोचक वक्तव्याला आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले होते. त्यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. मनोज जरांगेने कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखे काय आहे? आतापर्यंत ४०० वर्षात ब-याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? दाढी वाढवून छत्रपती होत नाही. गुणात्मक व्हायला पाहिजे अशा शब्दांत नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावत प्रत्युत्तर दिले. मराठ्यांनी २०२४ मध्ये ठरवायचे कुठे बसायचे. माझ्या विरोधात टोळ्या उतरवण्यात आल्या. कोकणातील एक जण सध्या भिताडाकडे बघत आहे, हे अग्या मोहळ कुठे कुठे चावेल. मी कधीच म्हणालो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिले.
नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
नारायण राणे यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना भिवसेना संपली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले ना, सगळे संपले. आमच्या देवेंद्र फडणवीस यांना शिव्या, देवेंद्र यांनी शिव्या दिल्या का? परत वार केला का? हा त्यांचा सज्जनपणा आहे. फडणवीस यांना सरकार कसे चालवावे ते कळते. वेड्याच्या नादी का लागावे? उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही. मी होतो ना, शिवसेनेत ३९ चाळीस वर्षे. कोकणाला काय दिले? बाकीची दुकाने बंद करा. कमळ फुलू दे ना घरात, दारात, देवळात, सगळीकडे कमळ फुलू दे, अशा शब्दांत खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.