पुणे : शहरातील विविध जिममधील तरुणांना शरीरयष्टी चांगली व्हावी. यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन मेफेटमाइन सल्फेट हे इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉइड इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दीपक बाबूराव वाडेकर (वय-३२, रा. खडकी) आणि साजन अण्णा जाधव (वय-२५, रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी पोलिस कर्मचारी तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे. संबंधित आरोपी हे न. ता. वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणा-या रस्त्यावर एका कारमध्ये बेकायदेशीर स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर आरोपींकडे औषधाचे बिल नसताना औषध घेणा-या व्यक्तीच्या जीवितास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहिती असताना देखील, संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने, बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे दिसून आले आहे. संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, याबाबतचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.