अयोध्या : भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयूच्या ५५ घाटांवर एकाच वेळी २५ लाख दिव्यांची रोषणाई करुन ‘राम की पाडी’ उजळून निघाली आहे. या दीपोत्सवासह एक मोठा विक्रम झाला आहे. दीपोत्सवात विक्रमी २५ लाख १२ हजार ५८५ दिवे लावून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. हे अनोखे दृष्य पाहण्यासाठी शरयूच्या दोन्ही बाजूला हजारो लोक जमले होते.
विशेष म्हणजे, तब्बल ५०० वर्षांनंतर पहिल्यांदाच अयोध्येतील लोक रामललाच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करत आहेत. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राम की पाडीसह ५५ घाट २५ लाख दिव्यांनी उजळून निघाले. एवढंच नाही, तर ११०० अर्चकांनी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित राहून दीपोत्सवाचा आनंद लुटत होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली आहे. पहिला म्हणजे, शरयूच्या तीरावर १ हजार १२१ जणांनी एकत्रितपणे आरती केली. दुसरा म्हणजे, २५ लाख १२ हजार ५८५ दिवे लावण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय पर्यटन-सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि योगी सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्री या क्षणाचे साक्षीदार होते.